प्रतिनिधी लोणीकंद
पुणे: दि.७ आक्टोंबर आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष तयारी लागले असून २०२४ च्या निवडणूकीची तयारी सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपासह विरोधकांनी देखील आपली मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राज्यामध्ये देखील लोकसभा २०२४ साठीची तयारी सुरु झाली असून महायुती अर्थात शिंदे, फडणवीस आणि पवार हे एकत्र लोकसभा निवडणूकीला समोरे जाणार असल्याची चर्चा आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोर लावली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे असे वक्तव्य अजित पवारांनी केले. सध्या त्यांचे हे वक्तव्य चांगलेच गाजते आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (दि.७) साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि कार्यकर्त्यांना देखील तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच या संवादावेळी हजारोंच्या संख्येने भाविक येतात तिथे सुविधा दिलेल्या आहेत. आणखी काय सुविधा द्यायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे असे लोकांनी सांगितले. ‘तेव्हा प्लॅन तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होत असते. आराखडा तयार केला आहे. पुढील बैठकीत तो आराखडा मंजूर केला जाईल हा शब्द देतो’ असे म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देखील भाष्य केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार अजित पवार यांनी बोलून दाखलवला.
‘तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. तुम्ही तिथे काय करतात? असे काही लोक विचारतात. आम्ही इथे आमची कामे करतो’ अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी आगामी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच गणेशोत्सव चांगला पार पाडला, आता नवरात्र आणि दसरा चांगला पडावा, यासाठी प्रयत्न करा. चांगला पाऊस पडून धरणे भरावीत, अशीच इच्छा सप्तश्रृंगी देवीकडे व्यक्त केली. हीच प्रार्थना केली, असे देखील अजित पवार यांनी नमूद केले