प्रतिनिधी लोणीकंद
लोणीकंद : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देवी-देवतांना सोशल मीडियावर अश्लील भाषेत शिविगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे.
वाघोली, (निओ सिटी बी.जे.एस. कॉलेजच्या मागे) राहणार सागर सावंत (वय-२१ ), याच्यावर आयपीसी २९५ (अ) नुसार गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र दिलीप पडवळ (वय-३० रा. वडकी गाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्य़ादीनुसार, आरोपी सागर सावंत याने फिर्यादी यांच्या बीड येथे राहणाऱ्या मित्राच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर कमेंट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच हिंदु देवी-देवतांबद्दल अश्लील विधान केले. आरोपीने हिंदुंच्या धार्मिक भावनांचा अपमान करुन बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी यांनी याबाबत तक्रार देताच पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील सहायक पोलीस निरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.