जातेगाव खुर्द (ता. शिरूर) – गावातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुलाला मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ तसेच औद्योगिक वसाहतीतील कामगार दररोज प्रवास करत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
सध्या वेळ नदीला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असून पुलालगतून वेगाने पाणी वाहत आहे. यामुळे पुलाखालून होणारी गाळधूप व भूगर्भातील धूप वाढून भगदाड अधिक वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांनी तात्काळ प्रशासनाने या पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता या मार्गावरील वाहतूक तात्पुरती वळवावी, अशीही सूचना नागरिकांकडून करण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासनाने वेळ न घालवता या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना न केल्यास येत्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.