मांडवगण फराटा (ता. शिरूर) | व्यापारी हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या नूतन कार्यकारिणीमध्ये मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील हरिमामा फराटे यांची जिल्हा सेक्रेटरी (सचिव) पदी निवड करण्यात आली आहे.
सुरुवातीस तालुक्यातील छोट्या पदावरून आपल्या कार्याची ठसा उमटवणाऱ्या फराटे यांची कार्यक्षमता लक्षात घेऊन, संघटनेने त्यांची टप्प्याटप्प्याने तालुका उपाध्यक्ष, नंतर तालुका संपर्कप्रमुख अशी पदोन्नती करत आता थेट जिल्हा सचिव पदावर नियुक्ती केली आहे.
ही निवड व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व कॅट महाराष्ट्र अध्यक्ष श्री. सचिनभाऊ निवगुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सहकार नगर येथील सातव हॉल येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात जाहीर करण्यात आली.
या वेळी पुणे जिल्हा कॅटचे शहर अध्यक्ष विकासजी मुंदडा, बापूसाहेब गायकवाड, नवनाथ सोमसे, अजित चंगेडीया, दत्ता जाधव, रीजवान खान, महिला शहर अध्यक्षा वैशाली माळी, अश्विनी खांडेकर, वर्षा कानिटकर आदींसह शेकडो पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर बोलताना हरिमामा फराटे यांनी संघटनेच्या माध्यमातून ग्रामीण वस्तीपर्यंत व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासन, वजनेमापे विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून मार्गदर्शन शिबिरे घेऊन व्यापारी वर्गास मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या कार्यकारिणीत हरिमामा फराटे यांचा समावेश होणे ही शिरूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.