श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा
“योग ही केवळ व्यायामप्रणाली नसून, ती एक परिपूर्ण जीवनशैली आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन साधणारा योग तणावमुक्त, आरोग्यदायी आणि एकाग्र जीवनाचा नैसर्गिक उपाय आहे,” असे प्रतिपादन श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव शंकर भूमकर यांनी केले.
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. “योग – सुसंवाद व शांतीसाठी” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन हार्टफुलनेस संस्था, तसेच महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग, एनएसएस आणि एसडब्ल्यूओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर भूमकर होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगामुळे मिळणाऱ्या फायदे उलगडून सांगितले. “श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि हृदयाचे कार्य सुधारते. मनःशांती मिळते आणि जीवनशैली अधिक आरोग्यदायी होते,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात हार्टफुलनेस संस्थेचे योगप्रशिक्षक विनय गुप्ता यांनी योगासने, प्राणायाम व ध्यान यावर प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी संस्थेचे खजिनदार उद्धव भूमकर, तांत्रिक संचालक सिद्धांत भूमकर, डीएमटी कंपनीचे संचालक विक्रम मखवाना, मायक्रोसॉफ्टचे प्रतिनिधी देवेंद्र थत्ते, झेन्सार कंपनीचे उपाध्यक्ष हर्बल जावळे, टीसीएस इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंता गौतम सागर, आणि शैक्षणिक तज्ज्ञ नेहा रावत यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योगाचा सातत्याने सराव करण्याचा निर्धारही यावेळी सहभागी सर्वांनी व्यक्त केला.