शिरूर (दि. १६ मे) : शिरूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात एका २१ वर्षीय युवकास चिलीमद्वारे गांजा सारखा अमली पदार्थ सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार नाथासाहेब जगताप, विजय शिंदे, अजय पाटील आदी कर्मचाऱ्यांसह अमली पदार्थविरोधी गस्त सुरू होती. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मार्केट यार्ड परिसरात एक युवक अमली पदार्थाचे सेवन करत आहे.
सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन पंचांना घेऊन घटनास्थळी गुप्तपणे पाठलाग केला असता, एका यंत्राच्या आडोशाला बसून एक इसम चिलीममध्ये काळसर हिरवट रंगाचा पदार्थ टाकून, त्यास आगपेटीच्या सहाय्याने तापवून त्यातून निघणारा धूर तोंडात घेत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने आपले नाव सोहम बाबाजी गायके (वय २१, रा. साईनगर, शिरूर) असे सांगितले. पुढील चौकशीत त्याने गांजा सेवन केल्याचे कबूल केले. एन.डी.पी.एस कायदा कलम ५० अन्वये त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक चिलीम, गांजासारखा पदार्थ व आगपेटी सापडली. सदर वस्तू पंचासमक्ष घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्या.
याप्रकरणी पोलीस अमलदार नितेश दत्तात्रय थोरात यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा क्रमांक ३३१/२०२५ नुसार एन.डी.पी.एस कायदा कलम ८(क) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करत असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.