पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीत परवानगीशिवाय तयार करण्यात येणाऱ्या प्लॉट्सच्या खरेदी-विक्रीसंदर्भात नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. “बेकायदेशीर प्लॉट म्हणजे फसवणुकीचा फास!” असा थेट इशारा देत नागरिकांनी केवळ कायदेशीर, मंजूर व अधिकृत प्लॉटमध्येच गुंतवणूक करावी, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.
सध्या पीएमआरडीएच्या हद्दीत अनेक ठिकाणी बोगस नकाशे, बनावट दस्तऐवज आणि फसव्या जाहिरातीद्वारे अनधिकृत प्लॉट्स विक्रीसाठी खुलेपणाने सादर होत आहेत. यामुळे अनेक नागरिक आर्थिक नुकसान सहन करत आहेत आणि भविष्यातील कायदेशीर अडचणींमध्ये अडकत आहेत.
“प्लॉट घ्यायचा आहे? तर आधी पीएमआरडीएची अधिकृत मंजुरी तपासा,” अशी स्पष्ट सूचना प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. कोणताही प्लॉट घेण्यापूर्वी त्याची वैधता, विकास आराखड्यातील स्थिती आणि परवानगीसंबंधीची कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि भविष्यातील कायदेशीर अडथळ्यांना टाळण्यासाठी कायदेशीर आणि मंजूर प्लॉटमध्येच गुंतवणूक करा, हा प्राधिकरणाचा स्पष्ट सल्ला आहे.