शिरूर (ता.१२ मे) — बारामतीला जाण्यासाठी एस.टी. बसमध्ये चढताना गोंधळाचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेचे सुमारे ४ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शिरूर येथील बसस्थानकावर घडली. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याच्या मिळालेल्या माहितीनुसार फीर्यादी रूपाली अनिल काळेल (वय ४८, रा. त्रिमूर्ती नगर, भिगवण रोड, जळोची, बारामती), दि. ११ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता त्या त्यांची मुलगी तन्वी व भाची साक्षी यांच्यासोबत बारामतीला जाण्यासाठी नायरा केडगाव चौफुला येथे एस.टी. बस क्र. एम.एच.१४ बी.टी. ४१९३ मध्ये चढत होत्या. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे असा एकूण ४,६८,८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनेनंतर फिर्यादी काळेल यांनी तात्काळ शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पो.ह.वा. २५ जगताप यांच्याकडे सोपवला आहे. पोलीस अधिक तपास करत असून बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
शहरात सार्वजनिक वाहतुकीत चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.