तांत्रिक तपासातून गुन्ह्याचा पर्दाफाश – शिक्रापूर पोलिसांची शानदार कामगिरी
शिक्रापूर येथील रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये झालेल्या तब्बल ५.५९ लाखांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत ६ चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत परिसरात एकच खळबळ उडवली आहे.
ही चोरी ४ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील भिंतीला छिद्र करून आत प्रवेश केला आणि कॉपर केबल, केबल कनेक्टर्स व १० बॅटऱ्या असा एकूण ५,५९,२५० रुपयांचा माल चोरला होता. या प्रकरणी श्री. नितीन भोर यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने संशयितांपर्यंत पोहचत, आलम मनीयार, अनिल गुप्ता, विरेंदर जाटाव, विशाल कश्यप, शिवम कश्यप व शामजी यादव या सहा चोरट्यांना अटक केली.
चोरीमध्ये वापरण्यात आलेला एक टेम्पो, युनिकॉर्न दुचाकी व इतर ८ मोटारसायकली, तसेच ३ लाख किंमतीच्या बॅटऱ्या असा एकूण ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोउनि महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे आदींनी महत्वाची भूमिका बजावली.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कौतुक होत आहे.