शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. दर वर्षी आषाढीला वारकरी दिंड्या पंढरीला जातात पण यावेळी बाल चिमुकल्यांची शिक्षणाची वारी जिल्हा परिषद शाळा गणेगाव दुमाला ते भीमा-घोड नदीच्या पावन संगम तिरी श्रीक्षेत्र संगमेस्वर या ठिकाणी गेली होती. या वारीत जि.प.प्रा.शाळा गणेगाव दुमाला, बंडवाडी, नाथाचीवाडी ,म्हसोबावाडी अशा चार शाळांतील सुमारे दीडशे मुलांनी आनंदाने सहभाग घेतला होता.
पालखी व वीणा पूजन उपस्थित ग्रामस्थ , पालक तसेच शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले होते. ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करत पालखीने गावातील राम-सीता मंदिरासमोर विश्राम घेतला. याच ठिकाणी गोल रिंगण आयोजित करण्यात आले होते. या रिंगणामध्ये छोट्या वारकऱ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ताल धरत रिंगणाचा आनंद घेतला. रिंगणामध्ये लहान मुले , पालक , ग्रामस्थ व शिक्षक यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. नंतर पालखी श्रीक्षेत्र संगमेश्वराकडे प्रस्थान करत असताना घरोघरी पालखीचे महिलांनी पूजन केले . पालखीत चालण्याचा आनंद बालगोपाळांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
संगमेश्वर येथे पोहोचल्यानंतर गणपती ,संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज,पांडुरंगाची आरती संगमेश्वराच्या देवालयात करण्यात आली. नंतर सर्व वारकऱ्यांना पुलाव भात, बुंदी , चिवडा व केळी यांचे सुग्रास भोजन देण्यात आले.
या पालखी साठी ग्रामस्थ- पालक सागर बोरावडे , विद्याधर बोरावडे , राहुल बोरावडे , भापकर मामा , रवींद्र शिंदे , शिवम शिंदे , रोहिणी बोरावडे , वनिता बंड यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच विकास काळे सर , भागवत शेंडकर सर , मुरलीधर कळसकर सर , गणेश ठाणगे सर , तुकाराम भोसले सर , सुनिता नागवडे मॅडम , मानसी काळे मॅडम, सतीश नागवडे सर व देविदास कुंभार सर या सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे नियोजन केले होते.