आषाढीवारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे उपस्थित होते.
आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
यावेळी आषाढी यात्रेच्या मुख्य सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये, महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त करुन स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच पत्रा शेड येथील दर्शन रांगेत वारकरी तसेच वारकरी भाविकांसाठी उभारलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६५ एकर येथून आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांशी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.