जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत स्टेशन येथे रंगला वैष्णवांचा मेळावा
दौंड, ता. ६ महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पुणे जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव तसेच इतर संतांच्या पालख्या पायी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी वारीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यवत स्टेशन शाळेतील बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दिंडीमध्ये बाल वारकऱ्यांनी पालखी सोहळा सह वृक्षदिंडी आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते.
दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, संत वेषभूषेत मुले टाळकरी व विणेकरी अशा पारंपरिक वेशभूषेत मुले दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी यवत गावचे उपसरपंच सुभाष यादव, महिला आणि जेष्ठ लोकांनी पालखीचे पूजन केले. पालखीमध्ये वृक्ष आणि ग्रंथ दिंडी पाहून सर्वांना या बाल वारकऱ्यांचे कौतुक केले. पालखीचे प्रस्थान नीलकंठेश्वर मंदिराच्या दिशेने झाले. जाताना विद्यार्थ्यांनी अभंग गायन केले तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. यामुळे विद्यार्थी व पालक भक्तीरसात दंग झाले होते. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका जयश्री रायकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वारीचा सांप्रदाविषयी आदर निर्माण व्हावा तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व पटावे, ग्रंथ, पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने असे उपक्रम शाळेत राबविले जातात.
यावेळी लता जगताप, शाळा व्यवस्थापन अध्यक्षा दीपाली थोरात, मंदा यादव, रेखा फडतरे, मंगल जगताप, अनिल हुंबे, रामहरी लावंड, संगीता टिळेकर, संगीता वाळके, उल्का दुनाखे, रुपाली शेळके, तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शाळेतील या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगताप हे उपस्थित होते. मुख्याध्यापिका जयश्री रायकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
” आपली परंपरा व संस्कृती यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी असे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. शाळेतील पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, लेखन व चिञकला साहित्याचे वाटप यादव यांनी स्वखर्चाने केले. तसेच यापुढे शाळेला सर्वांतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.