लोणीकंद/ पुणे प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. पवार हे बारामती तालुका अ वर्ग मतदार संघातून जिल्हा बँकेवर गेली 32 वर्षे प्रतिनिधीत्व करीत होते.
त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून या जागेवर नव्याने संचालकाची निवड होणार असल्याने त्या नावाबाबतही उत्सुकता लागून राहिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असलेला वाढता व्याप व राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी यामुळे मिळणारा अपुरा वेळ विचारात घेऊन पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून बारामती तालुका अ वर्ग मतदार संघातून नव्याने संचालक निवडीची प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.