प्रतिनिधी लोणीकंद
लोणीकंद ( ता.हवेली): आगामी काळात येणारे विधानसभच्या निवडणूकीमुळे इच्छुक उमेदवारांनी शिरूर-हवेलीत गाव भेट दौरे सुरू केले असून विविध विकास कामांचे भूमिपूजन, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावभेट, वाढदिवस, आरत्या अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने जनसंपर्क संवाद नेते मंडळींनी सुरू केला आहे.
भारतीय जनता पार्टी कडून पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्रीताई पलांडे, माजी सदस्य राहुल पाचर्णे अशी तगडी फळी विधानसभेसाठी कंबर कसून पक्षश्रेष्ठीची मर्जी संपादन करण्याच्या प्रयत्नात आहे.कंदांनी शिरूर-हवेलीसाठी जोरदार फील्डिंग लावून त्यांनी सर्व पक्षातील उमेदवार घेऊन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता हस्तगत केली. त्यामुळे हवेली तालुक्यात त्यांचे वजन वाढले आहे.
त्याचबरोबर जयश्री पलांडे यांनी गावोगावी जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्या असताना नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा पुढाकार होता. तसा जनसंपर्क वाढवण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. तर माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर शिरूर हवेलीत राहुल पाचर्णे यांना सहानुभूती मिळू शकते. कारण बाबूराव पाचर्णे यांनी आमदार असताना शिरूर हवेलीसाठी घरोघरी जनसंपर्क ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली.
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची साथ धरली असून त्यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावलेला आहे. आमदार अशोक पवार यांनी मतदार संघात दांडगा जनसंपर्क ठेवला असून, कार्यकर्ते पण नेटाने त्यांच्या बरोबरीने काम करत असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेतील फुटी नंतर ठाकरे गटानेही जोशाने निवडणुकीची तयारी केली आहे. नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माउली कटके यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्य करुन साजरा केला.जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून कटके हे मतदारसंघात सक्रिय असून आमदारकी लढाईची या हिशेबाने ते तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. तर ठाकरेंच्याच गटातील कट्टर निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असणारे शिरूर हवेली विधानसभा संघटक स्वप्निल कुंजीर हे ही आपल्या कामाच्या माध्यमातून लोकसंपर्क ठेवून आहेत. मतदारसंघात सर्व सामान्य माणसाच्या मनातील कार्यकर्ता अशी स्वप्नील कुंजीर यांची छबी आहे. रात्री अपरात्री नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा शिवसेनाचा ढाण्या वाघ अशी ओळख त्यांची मतदारसंघात आहे. शेजारील दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर अशा तालुक्यातील नागरिकांच्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या.
अजित पवार गटात शांतता आघाड्यांची गणिते काही असली तरी प्रत्येक पक्षाने आपआपली तयारी सुरु केल्याचे दिसून येते. त्यात पहिलवान मंगलदास बांदल यांनी मध्येच दंड थोपटून ते कोणत्या पक्षांकडून उमेदवारी मिळवतील व कोणाला चित्तपट करतील हे सांगता येत नाही. शिंदे गटाची भूमिका सर्वस्वी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर अवलंबून असून खासदारकीसाठी त्यांनी तयारी केली असून आमदारकीसाठी कुणाला उमेदवारी देतील हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. तर अजित पवार गटाची हालचाल सध्या शांतता असून अनपेक्षितपणे एक जबरदस्त उमेदवाराचे नाव पुढे येणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. या सर्व घडामोडीत सत्तेच्या सारीपाटात मतदारांच्या दिलाचा राजा कोण होईल हे लवकरच कळेल अशी चर्चा शिरुर हवेली मतदारसंघात चालू आहे.