प्रतिनिधी लोणीकंद
हवेली तालुक्यातील लोणीकंद-फुलगांव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व पिडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीपदादा व महाराष्ट्र राज्य क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली माती व गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
या स्पर्धेसाठी राज्यभरातील ३५ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४६ तालीम संघातील ९०० ते १००० मल्ल यांत भाग घेत आहेत. यांत नामांकित ४० मल्लांचा सहभाग आहे. ही स्पर्धा ५७ किलो,६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, ९७ किलो, महाराष्ट्र केसरी ८६ ते १२५ किलो अशा विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात होणार असून सोमेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने या आधी २००९-१० मध्ये लोणीकंद येथे हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.संदीप भोंडवे, कार्याध्यक्ष विलास कथुरे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके उपस्थित होते.