लोणीकंद प्रतिनिधी
लोणीकंद तालुका हवेली येथील मायभूमी फाउंडेशनचे सदस्य वृक्षप्रेमी सतीश शिंगणे यांनी सुखकर्ता युवा प्रतिष्ठान लोणीकंद सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित असलेल्या कार्यक्रमात बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आपण मागील तीन वर्ष ज्या संकटाची सोशल मिडियावर जागृती करत होतो आणि शेतीतज्ञांशी चर्चा करून रोखण्यासाठी प्रयत्न करत होतो ते कृत्रिम व प्लास्टिक फुलांचे संकट यंदा जास्त प्रमाणात दिसून येत आहे.कटफ्लॉवर्स पासुन झालेली सुरवात आता झेंडु आंबा तोरणा पर्यंत पोहोचली आहे.
मागील दोन वर्षांचा कोरोनाकाळ अपवाद वगळता फुलउत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करून गेला आहे अन हा आता शेवटचा घाव त्याच्यावर बसत आहे.यावर्षी सर्व मंदिरे खुली होऊन दहीहंडी, गणेशोत्सव अन दसरा दिवाळी जोरात साजरे होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी फुल पिकांचे विविध प्लॉट केले आहेत परंतु कृत्रिम व प्लास्टिकच्या फुलांचे मार्केटमध्ये प्रमाण बघता उत्पादन कमी असूनही नैसर्गिक फुलांना यावर्षी मागणी कमी जाणवत आहे.खरंतर आपण ज्या श्रद्धेने पूजावेळी, समारंभावेळी नैसर्गिक फुले वापरतो, जे वातावरण तयार होते त्याची सर या प्लास्टिक फुलांना बिलकुल नाही.नैसर्गिक फुलांचा गंध,सुवास,नजाकत या प्लास्टिक फुलांना नाही तरीही त्यांची सहज उपलब्धता,दिखाऊपणा आणि स्वस्तात असल्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे वाढू लागला आहे. नैसर्गिक फुले ही एकदा वापरल्यानंतर टाकून देतो त्यावेळेस त्याचे विघटन होऊन जाते परंतु प्लास्टिक फुले ही वर्षानुवर्षे तसेच राहणार आणि पर्यावरणाचा नाश होणार. दरवर्षी शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळवून देणारे पीक आता कमी होत जाणार आणि आधीच अडचणीत असलेला शेतकरी अजून संकटात येणार. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून प्लास्टिक फुलांचा वापर टाळून नैसर्गिक फुले खरेदी करून शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला साथ देण्याची गरज आहे. मागील वेळी आपण #फ्रुटकेक चळवळ यशस्वी करून दाखवली होती आत्ता प्लास्टिक फुल बंदी ही चळवळ सुद्धा यशस्वी करून दाखवू.
सर्व शेतकऱ्यांनापण विनंती आहे की आपआपल्या लोकप्रतिनिधिंना शासन दरबारी दबाव टाकुन बंदी साठी भूमिका घेण्यास सांगावी.सर्व बाजूंनी हा लढा तीव्र करून कृत्रिम व प्लॅस्टिक फुलांच्यावर कायमस्वरूपी बंदी झालीच पाहिजे चला सुरुवात करू प्लास्टिक फुले टाळूया त्यामुळे त्यामुळे शेतकरी फुलणार आहे असे मत त्यांनी शिरूर हवेली न्यूज शी बोलताना व्यक्त केले.