हडपसर: गुन्हे शाखेतील दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – २ चे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी कारवाईचे अनुषंगाने हडपसर, वानवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, राहुल इंगळे आणि संदीप येळे यांना एकजण चोरीच्या गाडी सह लक्ष्मी एन्क्लेव्ह’ जवळ उभा असल्याची माहिती यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळाली.प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मुझफ्फर रफिक पठाण वय २६, रा. मांजरी,हडपसर या आरोपीला अटक केली.
आरोपीला पोलिसी खाक्या दाखवून त्याची कसुन चौकशी केली असता तो चोरी करण्यासाठी येताना आठ ते दहा वेगवेगळ्या रंगांचे शर्ट एकावर एक घालून बनावट चावीने दुचाकी चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच चोरी झाल्यानंतर शर्ट काढून फेकून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून वाहन चोरीचे तब्बल आठ गुन्हे उघडकीस झाले असून, पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या आरोपीने हडपसर, विमाननगर, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण आठ वाहने चोरल्याचे समोर आले.
पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ,गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, राहुल इंगळे आणि संदीप येळे यांनी ही कारवाई केली.