लोणीकंद, (प्रतिनिधी ): पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे वारे जोर धरू लागले असून, इच्छुकांनी मैदानात उतरण्याआधीच सोशल मीडियावर जोरदार उपस्थिती दर्शवायला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतीच जाहीर केलेली नव्या गणरचनेची प्रारूप यादी जिल्ह्यात मोठ्या उलथापालथी घेऊन आली असून, यामुळे अनेक इच्छुकांचे राजकीय समीकरणे कोलमडली आहेत.
या पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवार केवळ सोशल मीडियाच्या आधारे आपली उपस्थिती दर्शवताना दिसत आहेत. मंत्र्या-संत्र्यांसोबतचे फोटो, विविध बॅनर, शुभेच्छांचे संदेश आणि समाजकार्याच्या नावाखाली केलेली ‘फोटोझ’ पोस्ट या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे सर्व ‘ऑनलाईन’ प्रयत्न पाहून सामान्य नागरिक संभ्रमित झाले आहेत.
सध्याच्या घडीला अनेक नव्या चेहऱ्यांनी थेट सोशल मीडियावरूनच आपली ताकद आजमावायला सुरुवात केली आहे. गावोगावी, वाड्यावस्त्यांवर, शाळा-आरोग्य केंद्रांमध्ये वर्षानुवर्षे खांद्याला खांदा लावून कार्य करणारे काहीजण मात्र अजूनही शांत आहेत. त्यामुळे ‘निवडणुकीत मत द्यायचे कोणाला? – फक्त फेसबुक-इंस्टाग्रामवर असणाऱ्यांना की खऱ्या अर्थाने सामाजिक प्रश्नांवर लढणाऱ्यांना?’ असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर “जनतेसोबत आहोत”, “आपले सेवक”, “समस्यांचे निराकरण” अशा प्रकारचे स्लोगन देत कार्यकर्ते आपली प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्यक्षात गावात, मतदारसंघात त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, अशी टीका अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे.
नव्या गणरचनेनंतर काही प्रस्थापितांना धक्का बसला असला, तरी नवख्या उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या वेळी पारंपरिक व सोशल मीडिया आधारित प्रचारात रंगतदार लढत पाहायला मिळणार, हे निश्चित.
जनतेची अपेक्षा — काम करणाऱ्यालाच पसंती!
राजकारणात सोशल मीडियाचा प्रभाव नाकारता येणार नाही, परंतु केवळ फोटोंवरून उमेदवार ठरवला जाणार नाही, असा संदेश जनतेतून उमटू लागला आहे. ‘खरा कार्यकर्ता तोच, जो जनतेत राहून काम करतो’ अशी भावना गावपातळीवर अधिक तीव्र होत आहे.
आगामी निवडणुकांत सोशल मीडिया रणनीती किती परिणामकारक ठरते आणि जमिनीवरच्या कामाच्या बळावर कोण बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.