वाघोली : कामगार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजाभिमुख कार्यात सातत्याने झोकून देणाऱ्या पुण्यातील सचिन थोरात यांना ‘विश्वकर्मा उद्योग भूषण’ हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी देशभरातून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, संगीत तसेच शासकीय व निमशासकीय सेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली. यामध्ये कामगार क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य करणारे आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी नेहमीच पुढे असलेले सचिन थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या सामाजिक भानातून प्रेरित होत विविध उपक्रमांद्वारे त्यांनी कामगार क्षेत्रात सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. लवकरच कोल्हापूर येथे पार पडणाऱ्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
थोरात यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.