लोणीकंद (ता. हवेली) : गावातील श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान म्हसोबा मंदिरात दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेची चोरी केल्याची घटना २८ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास मंदिरात प्रवेश करून दानपेटीची कडीकोंडा तोडल्याचे दिसत आहे. मात्र चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसून येत नाही.
दरम्यान, सकाळी दर्शनासाठी आलेल्या विमल फराटे यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने ही माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर गावात एकच खळबळ उडाली, चोरीच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने लोणीकंद परिसरात सुरक्षा व्यवस्थेची गरज अधोरेखित होत आहे. या घटनेची गंभीर दखल घ्यावी आणि मंदिर परिसरात सुरक्षेची योग्य उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.