वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी ‘वाघोली विकास मंच’ या नव्या सामाजिक-राजकीय व्यासपीठाची स्थापना करण्यात आली असून, या मंचाच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचा निर्धार डॉ. पवन सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
डॉ. पवन सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात या मंचाची घोषणा करण्यात आली. वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत कोलते आणि शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक गणेश सातव यांच्या हस्ते मंचाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सोनवणे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “वाघोलीच्या सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि येथील मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावणे हेच या मंचाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारण हे माध्यम आहे; सेवा आणि विकास हा खरा हेतू आहे. मी वाघोलीकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.”
डॉ. पवन सोनवणे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि समाजसेवेद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘वाघोली विकास मंच’च्या स्थापनेनंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिकृत सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीत डॉ. सोनवणे हे रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. मात्र, ते कोणत्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार, हे अद्याप अस्पष्टच आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी निर्णयाकडे संपूर्ण वाघोलीचे लक्ष लागले आहे.