पेरणे (ता. हवेली) : पेरणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अंकिता हनुमंत सरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच सुजित वाळके यांनी नुकताच राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत सरडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे सरपंच उषा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभा बैठकीत त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
या निवडीप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी दादाभाऊ नाथ, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने अंकिता सरडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अंकिता सरडे या सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून, त्यांचा लोकसंपर्कही दांडगा आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी यापूर्वीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीने ग्रामस्थांत समाधानाची आणि उत्साहाची भावना निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा संकल्प त्यांनी निवडीनंतर व्यक्त केला. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून, पेरणे गावातील महिला नेतृत्वाला नवे बळ मिळाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.