वाघोली, प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून वाघोलीतील गेरा वर्ल्ड ऑफ जॉय प्रकल्पातील गायब झालेल्या ट्रान्सफॉर्मरप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली असून, संबंधित २०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अखेर सापडल्याची प्राथमिक माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. मात्र, ट्रान्सफॉर्मर कुठे, कसा आणि कुणाच्या संमतीने हलवण्यात आला, याबाबत कोणतीही ठोस नोंद उपलब्ध नसल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे.
सदर ट्रान्सफॉर्मर २०१९ मध्ये प्रकल्पात बसवण्यात आला होता. २०२० पासून तो निष्क्रिय अवस्थेत असताना, एप्रिल २०२५ मध्ये गतीशक्ती ॲपद्वारे करण्यात आलेल्या मॅपिंगदरम्यान ट्रान्सफॉर्मर गायब असल्याचे निदर्शनास आले. यानंतर महावितरणच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ट्रान्सफॉर्मरसारखा अवजड वीज साहित्य हलवण्यासाठी शाखा अधिकाऱ्यांची लेखी परवानगी, लाईन बंद करणे आणि अन्य प्रक्रिया आवश्यक असतात. मात्र, संबंधित शाखेतून अशी कोणतीही नोंद आढळून आलेली नाही. त्यामुळे महावितरणमधीलच कोणतेतरी अंतर्गत हात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात आता तपासाला गती मिळत असली तरी अनेक अनुत्तरित प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. ट्रान्सफॉर्मर सापडल्याने गुन्हा मिटत नाही, तर तो कोठून सापडला, कोणी हलवला, त्यामागील कारणे काय होती, याचा तपशील समोर येणे गरजेचे आहे.
स्थानिक नागरिकांकडून देखील प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून, “फक्त अज्ञात आरोपी दाखवून चालणार नाही, बिल्डर, जमीनमालक तसेच महावितरणचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कारवाई व्हावी,” अशी जोरदार मागणी केली जात आहे.
सदर प्रकरणामध्ये ट्रान्सफॉर्मर गायब करण्यामागे एखाद्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त होत असून, ट्रान्सफॉर्मर जरी सापडला असला तरी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे जनतेचे मत आहे. अन्यथा भविष्यात अशाप्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
संपर्कात असलेले सूत्रे सांगतात : “हा ट्रान्सफॉर्मर गायब कसा झाला याची कोणतीही अधिकृत नोंद नसणे, हीच बाब सर्वाधिक संशयास्पद आहे. यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असल्याची शक्यता आहे.”