जुने दिवस, जुनी मैत्री – अठरा वर्षांनंतर पुन्हा उजळल्या आठवणी
वाघोली (ता. हवेली) येथील विष्णूजी शेकोची सातव हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी (सन २००६-०७) चे माजी विद्यार्थी तब्बल अठरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. शनिवार, ७ जून रोजी पार पडलेला हा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. जुने मित्र, आठवणींचा गहिवर आणि शिक्षकांचा स्नेह पुन्हा अनुभवताना उपस्थित माजी विद्यार्थी क्षणोक्षणी भावूक होत होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या वर्गात बसण्याचा अनुभव घेतला. वर्गखोल्या, शाळेचा परिसर आणि त्या आठवणींनी भरलेल्या कोपऱ्यांनी उपस्थितांची मनं भारावून गेली. प्रत्येकाने आपली ओळख करून देताना सध्याच्या व्यवसायाची व आयुष्याची वाटचाल उलगडली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर भेटलेल्या वर्गमित्रांमध्ये पुन्हा आपुलकीचे बंध निर्माण झाले.
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देताना काहींनी विद्यार्थीदशेतील किस्से सांगितले तर काहींनी शिक्षकांच्या आठवणी शेअर करत हास्यविनोदाचा माहोल निर्माण केला. या स्नेहमेळाव्याचे संपूर्ण आयोजन माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात काही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला. शाळेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि मैत्रीच्या नात्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत स्नेहमेळाव्याची सांगता झाली. हा अनुभव सर्वांसाठीच संस्मरणीय आणि भावनिक ठरला.
“शाळा संपून अठरा वर्षे झाली, पण आजही त्या आठवणी ताज्या आहेत. शाळेने केवळ शिक्षणच दिलं नाही, तर आयुष्य जगायला शिकवलं. जुने मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाचे क्षण – सर्व काही पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, हे खूप आनंददायक होतं. पुन्हा एकत्र येणं ही खूपच भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट होती.”- ज्ञानेश्वर तांबे