शिरूर परिसरातील १३ अल्पवयीन बालिका, ४५ महिला व ३५ पुरुषांचा यशस्वी शोध.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत घरातून बेपत्ता झालेल्या १३ अल्पवयीन बालिका, ४५ महिला आणि ३५ पुरुषांचा शोध घेण्यात शिरूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या सर्व बेपत्ता व्यक्तींना शोधून काढून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूपपणे सुपूर्द करण्यात आले आहे.
घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन बालिकांबाबत दाखल झालेल्या १३ तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी गुन्हे शोध पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह पथकाला तात्काळ शोध मोहिमेसाठी आदेश दिला होता. तांत्रिक विश्लेषण, बातमीदारांकडून माहिती संकलन व प्रभावी तपासाच्या माध्यमातून या सर्व बालिकांचा शोध घेण्यात आला.
तसेच शिरूर शहर व परिसरातून मिसिंग झालेल्या महिलांचा व पुरुषांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकात पोलीस हवालदार संपत खबाले, पोलीस अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे आणि महिला पोलीस अंमलदार सारिका माळी यांचा समावेश होता. अवघ्या एका महिन्यात ४५ महिला आणि ३५ पुरुषांचा शोध घेऊन त्यांनाही त्यांच्या कुटुंबियांकडे परत करण्यात आले.
ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, स्थानिक पातळीवर या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.