प्रतिनिधी | वाघोली
वाघोली (ता. हवेली) येथील काही गट नंबरमधील जमिनींना शेती व नॉन-डेव्हलपमेंट झोनमधून वगळून “रहिवासी” झोनमध्ये समाविष्ट करण्यास महाराष्ट्र शासनाने अधिकृत मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २०(४) अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
नगर विकास विभागाच्या १४ मे २०२५ रोजीच्या निर्णयानुसार, वाघोलीतील जुने गट नंबर २२१७ (पैकी), २२७४ ते २२७७, २२८५, २२८६ (पैकी), २२८७ (पैकी), तसेच नवीन गट नंबर १२३१ (पैकी), १२८८ ते १२९१, १२९९, १३०० (पैकी), १३०१ आणि २३०१ पैकी १३१५ पैकी या गटांतील काही जमिनींना ‘रहिवासी’ झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
तथापि, या जमिनींच्या अंतिम मान्यतेसाठी संबंधित जमीनधारकांनी दि. ३१ मे २०२५ पूर्वी अधिमूल्य, प्रक्रिया शुल्क व जाहिरात शुल्क भरणे आवश्यक आहे. तसे न केल्यास संबंधित जमिनी फेरबदल प्रक्रियेतून वगळण्यात येणार असून त्या पुन्हा शेती क्षेत्रात समाविष्ट केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नाल्याच्या हद्दीत कुंपणभिंत बांधण्यास बंदी असून यासाठी स्वतंत्र प्रस्तावाद्वारे सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक राहील.
सदर अधिसूचनेची प्रत व संबंधित भाग नकाशा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय तसेच सहायक संचालक, नगर रचना कार्यालय, पुणे येथे नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे. तसेच www.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळावर देखील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. — महाराष्ट्र शासन, नगर विकास विभागाच्या आदेशानुसार प्रसिद्ध (प्रणव कर्पे, अवर सचिव)