मांजरी खुर्द येथील गट नं. ६४५ मधील ‘ओम चैतन्य डेव्हलपर्स’ या गृहप्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४३ वीज कनेक्शनपैकी ३४ कनेक्शन देताना आवश्यक कामे न करता कनेक्शन देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महावितरणचे सुमारे १.२० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सदर प्रकल्पासाठी डेव्हलपर्सनी ३६ नव्या कनेक्शनसाठी AL फॉर्म सादर केला होता. याआधी ९ कनेक्शन वितरीत करण्यात आली होती. उर्वरित ३४ कनेक्शन देताना Backfeed (3.5C ×120 Sqmm LT XLPE) केबल, मिनी फीडर पिलर, DTC मीटर, CT, AB Switch आणि DO Set यांसारखी आवश्यक उपकरणे व सुविधा न बसवता, तसेच DTC कोड जनरेट न करता थेट वीज कनेक्शन देण्यात आले. या कामासाठीचा Release Orderही सादर करण्यात आलेला नाही.
या प्रकरणात विद्युत कंत्राटदार श्याम ढगे (M/s System Electrical Works, M.C. No. 28182) यांच्याकडून गंभीर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करण्याची शिफारस संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. याशिवाय ढगे यांच्यावर यापूर्वीही वाघोली विभागात मीटर रीडिंगवेळी चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
महावितरणच्या अहवालानुसार ठेकेदाराकडून आवश्यक कामे न करता कनेक्शन दिल्याने सार्वजनिक संस्थेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराला Black List करणे, तसेच पोलिसांत तक्रार दाखल करणे गरजेचे असल्याचे मत विभागीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.हे प्रकरण केवळ आर्थिक फसवणुकीचेच नसून, विद्युत सुरक्षेशीही निगडित असल्याने अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असून, दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.