वढू खुर्द (ता. हवेली) : क्रेस्ट (Chest Research and Training Pvt. Ltd.) व मायभूमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज रविवार, दि. १ जून २०२५ रोजी कल्पवृक्ष प्री-प्रायमरी स्कूल, वढू खुर्द येथे उत्साहात पार पडले. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित या शिबिरात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
या शिबिरात फुफ्फुसांच्या आरोग्य तपासणी, रक्तदाब, साखरेची पातळी, उंची आणि वजन मोजमाप आदी मोफत तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित नागरिकांना वैद्यकीय सल्ला व वैयक्तिक आरोग्य अहवालही प्रदान करण्यात आला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी गावच्या सरपंच रसिका ताई चोंधै, उद्योजक अनिल भाऊ चोंधै, नवनाथ पवळे, ग्रामपंचायत सदस्य, मायभूमी फाउंडेशनचे नंदकुमार डोके सर, बाळासाहेब अंभोरे, सतीश शिंगणे, काका डोके, समीर झुरूगे, चेतन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन क्रेस्ट व मायभूमी फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आरोग्य जनजागृतीस चालना मिळाली आहे. आयोजकांनी भविष्यातही असे उपक्रम राबविण्याची ग्वाही यावेळी दिली.