लोणीकंद, भावडी, फुलगाव परिसरात बेकायदेशीर खाण व्यवसायाचा मोठा खेळ सुरू आहे आणि यावर आता प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. प्राथमिक माहितीनुसार याच पार्श्वभूमीवर मंगळवार, २७ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता सोयरीक मंगल कार्यालयात खाण उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते स्वतः उपस्थित राहणार असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भागात केवळ १२ खाणी अधिकृत परवानाधारक असूनही प्रत्यक्षात अनेक बेकायदेशीर खाणी धडाक्यात सुरू आहेत. अधिकारी ‘पाहतंय काय?’ या भूमिकेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. काही जागरूक नागरिकांनी तर थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
आजची बैठक म्हणजे उद्योजकांना “थेट मेसेज” देण्याचा प्रयत्न की केवळ औपचारिकता, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खाणींच्या नावाखाली कायद्याची पाय मल्ली करणाऱ्याना आता प्रशासन थांबवणार का, हेच खरे पाहणे आहे.
यापूर्वी कारवाईचा ठोस मागमूस नसल्याने खाणीवाले निर्धास्त होते. मात्र आज तहसीलदारांच्या उपस्थितीत ‘खणखणीत’ निर्णय घेतला गेला तर अनेकांचे डोळे उघडतील. बैठकीत जर केवळ ‘बोलाचीच कढी’ झाली, तर प्रशासनावरच बोटं उठतील. तर, बेकायदेशीर खणांवर ‘कोलते’ कोरडं झाडणार का थेट कुऱ्हाड? याचं उत्तर आजच्या बैठकीत मिळेल!