लोणीकंद | प्रतिनिधी
लोणीकंद हद्दीतील एका नामांकित क्रेशर मालकाने तब्बल १ कोटी ३५ लाखांचं वीज बिल थकवलं असूनही, शेजारून बेकायदेशीररित्या लाईन जोडून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, मात्र यानंतर कारवाई झाली की नाही, हे अंधारातच आहे. त्यामुळे “सत्तेचं सावत्र न्याय” हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सामान्य नागरिकाच्या घरात एक हजाराचं बिल थकलं तरी महावितरण वीज तोडते, मग कोट्यवधींचं थकीत असलेल्या क्रेशर मालकावर सौजन्य दाखवायचं ठरवलंय का? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
महावितरणने पंचनामा केला, इतकं पुरेसं नाही. ‘कायदेशीर कारवाई कुठे आहे?’, ‘एफआयआर नोंदवण्यात आला का?’, ‘थकबाकी वसूल कधी होणार?’ — या प्रश्नांची उत्तरं महावितरणकडे आहेत का?
या प्रकारातून ‘पैशाची ताकद, ओळखीचं बळ आणि सत्ताधाऱ्यांची छत्रछाया’ यांचा वापर करून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना अभय दिलं जातंय का, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
महावितरणच्या दुटप्पी धोरणामुळे सामान्य ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, आणि या प्रकारावर कठोर आणि वेळेत कारवाई झाली नाही तर, “सत्ताधाऱ्यांचे हितसंबंधच झाकले जाताहेत”, असा संदेश जनतेत जाईल हे निश्चित.