पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी येथे रस्त्यालगत उभारण्यात आलेले एक भले मोठे अनधिकृत होल्डिंग कोसळले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र होल्डिंग खाली सात ते आठ दुचाकी अडकून त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. होल्डिंग जोरदार वाऱ्यामुळे किंवा निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे कोसळले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून स्थानिक प्रशासन आणि महापालिका यंत्रणेला जबाबदार धरले जात आहे.
या घटनेमुळे अनधिकृत होल्डिंग्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा होल्डिंग्समुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.