लोणीकंद,( प्रतिनिधी) | १२ मे २०२५ — शेतातील खाजगी रस्त्यावरून वाहन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याच्या कुटुंबावर चार जणांनी एकत्र येत हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजता खुटाळी वस्ती, वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगेश तुकाराम कामठे (वय ३२, रा. खुटाळी वस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी आपल्या फॉर्च्युनर कारमधून पत्नी साक्षी आणि मुलगा आरव यांच्यासह सासरी जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्या खाजगी रस्त्यावरून समोरून ब्रेझा गाडी (क्र. एम.एच. १२ डब्ल्यू.पी. ४२०४) आली. वाहन थांबवण्याचा इशारा देऊनही संबंधित चालकाने गाडी थांबवली नाही. त्या गाडीतील दोघे जण खाली उतरून हातात लाकडी दांडके घेऊन कामठे यांच्यावर धावून आले आणि “तुला माहिती नाही का मी कोण आहे?” असे म्हणत त्यांना मारहाण केली. या दोघांनी हातात लाकडी दांडके घेऊन कामठे यांच्यावर हल्ला केला. कामठे यांचा हात पिरगळण्यात आला असून त्यांच्या पाठीवर व हातावर मारहाण करण्यात आली.
दरम्यान, भांडण सोडवण्यासाठी खाली उतरलेल्या पत्नी साक्षी कामठे यांच्यावर निर्मला गावडे या महिलेनं केस ओढत ढकलून देत मारहाण केली. इतक्यावर न थांबता तिघांनी मिळून जीवे मारण्याची धमकीही दिली. आवाज ऐकून कामठे यांचे चुलत भाऊ मनोज आणि वडील घटनास्थळी धावून आले आणि भांडण शांत केले.
यानंतर कामठे कुटुंबीय लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, तेथे वंदना शिवले नावाच्या महिलेने त्यांना धमकावत, “तु तक्रार देऊन तर बघ, तुला दाखवते,” असे म्हणत मनोज कामठे यांनाही मारहाण केली, असा आरोप आहे.
या प्रकरणी मयूर गावडे, शेखर गावडे, निर्मला गावडे आणि वंदना शिवले यांच्याविरोधात भा.न्या.सं. 2023 मधील कलम 118(1), 115(2), 3, 352, 351(3), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.