पुणे – वाघोली वाहतूक विभागाने अवजड डंपर व टिपर वाहनांवर मोठी कारवाई करत ५१ वाहने ताब्यात घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल ६ लाख ८९ हजार १२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ मे ते ९ मे २०२५ या कालावधीत राबवण्यात आली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे आणि सहा. पोलीस आयुक्त सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम वाघोली वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईदरम्यान जप्त केलेल्या डंपरमधून मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने मोटार वाहन कायद्यानुसार कलम १९४(१), टॅक्स पेंटिंग १२-बी, पीयूसी, इंडिकेटर मार्किंग, नो एन्ट्री उल्लंघन अशा विविध कारणांवरून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच, डंपर चालकांना माल भरल्यानंतर आच्छादन टाकणे, नो एन्ट्रीमध्ये प्रवेश न करणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढेही नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाघोली वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.