प्रदीपदादा कंद यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष संगोपनासाठी ५४ हजारांची मदत
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक विधायक उपक्रम राबवण्यात आला. वाढदिवसानिमित्त कोणताही उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम न करता, वृक्षसंवर्धनासाठी मदत देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
शिरूर तालुक्यातील सध्या बंद अवस्थेतील घोडगंगा साखर कारखान्याच्या परिसरातील वृक्ष संगोपनासाठी प्रदीपदादा कंद मित्र परिवाराकडून तब्बल ५४ हजार रुपयांची मदत जाहीर केली. ही रक्कम वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, जय कंद, शंकर शिंदे, बबलु पाटील शेलार आणि सुरज घाडगे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते उमेश रणदिवे यांच्याकडे धनादेशाच्या स्वरूपात सुपुर्द करण्यात आली.
रांजणगाव सांडस येथील उमेश रणदिवे हे गेली अनेक वर्षे देशी वृक्षांचे रोपण व संगोपनाचे कार्य करत असून त्यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक झाडांची लागवड केली आहे. घोडगंगा साखर कारखाना परिसरातील सुमारे २५०० झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने टँकरद्वारे झाडांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.
या मदतीबाबत सरपंच सचिन शेलार म्हणाले, “प्रदीपदादा कंद हे पर्यावरण संरक्षण, सामाजिक कार्य आणि ग्रामविकासात सदैव आघाडीवर राहिले आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आम्ही हा छोटासा प्रयत्न केला.”
प्रदीपदादा कंद यांचा वाढदिवस दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा केला जातो, हे विशेष. यंदाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या सामाजिक योगदानाला उजाळा देत “प्रदीपदादांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या पुढील वाटचालीत यश आणि आरोग्य लाभो,” अशी प्रार्थना करत गावकऱ्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.