पुणे, दि. ५ मे २०२५ – वाघोली गावठाणातून जाणाऱ्या वाघोली-लोहगाव रस्त्याला एकेरी करण्याच्या प्रस्तावित निर्णयाला अष्टविनायक मित्र मंडळाने तीव्र विरोध दर्शविला आहे. मंडळाचे अध्यक्ष सागर म्हस्के आणि उपाध्यक्ष प्रणव सातव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचे अप्पर आयुक्त मा. मनोज पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.
ग्रामस्थांची प्रमुख कारणे पुढे पुढे आली:
या निर्णयामुळे सुमारे १००० ते १२०० व्यावसायिक दुकाने व २५,००० कामगारांचे रोजीरोटीचे प्रश्न निर्माण होतील, असे मंडळाने नमूद केले आहे. हा रस्ता वाघोली गावास पुणे-नगर महामार्गाशी जोडणारा एकमेव मोठा व महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे कोंडी किंवा आपत्कालीन प्रसंगीही तो मार्ग अत्यावश्यक ठरतो.
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर
शाळेत जाणाऱ्या व येणाऱ्या मुलांसाठी हा एकच सोयीचा मार्ग आहे. एकेरी केल्यास वाहतूक मुख्य रस्त्यावर वळवावी लागेल, ज्यामुळे गर्दी, अपघात व जीवितहानीचा धोका वाढेल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
रुग्णवाहिका सेवा व धार्मिक मिरवणुकांवर परिणाम
रस्त्यालगत असलेल्या हॉस्पिटल्स, पॅथोलॉजी लॅब्समुळे रुग्णवाहिका सेवा अडथळ्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच धार्मिक व सांस्कृतिक मिरवणुकांचा मार्गही हा रस्ता असल्यामुळे गावातील सामाजिक समत्वालाही धक्का बसेल.
मंडळाने दिले पर्यायी उपाय:
अवजड वाहने बंदी
रॉंगसाईड वाहनांवर कारवाई
अतिक्रमण हटवणे
दुभाजक वाढवणे
चौकाचा विस्तार
वाहतूक नियोजनासाठी बैठक घेण्याची मागणी नकाशासह निवेदन सादर यासोबतच वाहतूक नियोजनाचा नकाशा देखील प्रशासनाला सादर करून मंडळाने निवेदनात स्पष्ट केले आहे की, ग्रामस्थांच्या मतविवेकाचा आदर करून योग्य निर्णय घेण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात पुढील जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या घडामोडींमुळे वाघोली परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून प्रशासनाच्या पुढील निर्णया कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.