शिरूरचे; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी:
शिक्रापूर (ता. शिरूर) – टेमघर प्रकल्पग्रस्तांसाठी शिक्रापूर (राऊतवाडी) येथे उभारण्यात आलेल्या लव्हार्डे पुनर्वसन गावठाणात मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. गट क्रमांक ४२, ५० आणि ५८९ या जमिनींवर काही प्रकल्पग्रस्तांनी अनधिकृत प्लॉटिंग सुरू केल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप पसरला आहे.
या बेकायदेशीर कारवाईत सरकारी मालकीचे रस्ते, स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालये व गटार यंत्रणा उद्ध्वस्त केल्या गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, “स्मशानभूमीवर माती टाकून प्लॉटिंगचा भाग बनवला जातोय,” असा गंभीर आरोपही समोर आला आहे.
संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री यांच्याकडे थेट तक्रारी दाखल केल्या. तक्रारीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी व जिल्हाधिकारी, पुणे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून, चौकशीला वेग मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, लवकरच दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.