लोणीकंद,( ता हवेली) ३० एप्रिल; अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लोणीकंदच्या शैक्षणिक आणि ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि हवेली गटविकास अधिकारी मा. भूषण जोशी यांच्या आकस्मिक दौऱ्याने गावातील विकासकार्याला नवे बळ मिळाले.
दौऱ्याची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेच्या सखोल पाहणीला प्रारंभ करण्यात आला. ग्रंथालय, विज्ञान केंद्र, आधुनिक तंत्रज्ञानस्नेही उपक्रम, रोबोटिक्स, नासा-इस्रो परीक्षेची तयारी, जर्मन भाषा अध्ययन, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण – या सर्व नवोन्मेषी प्रकल्पांची माहिती घेत अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेतील यश, तसेच ‘पी.एम. श्री’ व मॉडेल स्कूल म्हणून झालेली निवड याबद्दल शाळेच्या कार्यसंस्कृतीचे भरभरून कौतुक करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी, “इयत्ता आठवी सुरू करण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करा, मंजुरी लगेच देतो,” अशी ठोस घोषणा केली. “या शाळेला दहावीपर्यंत विस्तार द्या,” अशा स्पष्ट सूचना देऊन शिक्षण विस्तारास दुजाभाव न करण्याचा संदेश दिला.
सरपंच मोनिका कंद यांच्या हस्ते मा. गजानन पाटील यांचा तर माजी सरपंच श्रीकांत कंद यांच्या हस्ते मा. भूषण जोशी यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांची शिक्षणविषयीची तळमळ, शिक्षकांची कार्यतत्परता आणि निसर्गरम्य, सुसज्ज शाळा पाहून अधिकारी भारावून गेले.
यानंतर ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा थेट आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन पार्क येथे स्वतः वृक्षारोपण, महिला बचत गटांच्या कार्याविषयी चर्चा, अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार व्यवस्थेची तपासणी — एकंदर पाहणीने गावाच्या सर्वांगीण विकासावर अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले.
याप्रसंगी राहूल शिंदे, सोहम शिंदे, सोनाली जगताप, श्रीकांत जगताप, जय कंद, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, बांधकाम अभियंता कोकाटे मॅडम, विस्ताराधिकारी मोरे साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी शंकर मुंढे, केंद्रप्रमुख शांता इचके, मुख्याध्यापिका जयश्री अनुसे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग शिक्षक वृंद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षक एकनाथ शिंदे यांनी शाळेची संपूर्ण वाटचाल सादर केली. सरपंच मोनिका कंद यांनी आभार मानताना “गावाचा शैक्षणिक विकास हा लोकसहभागातून शक्य झाला आहे,” असे नमूद केले.
“कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभरारीचं वेड रक्तात असावं लागतं!” लोणीकंदच्या शैक्षणिक गगनभरारीस अशीच प्रेरणा ठरणारी ही भेट, गावाच्या शिक्षण क्षेत्रातील गौरवशाली परंपरेला नवसंजीवनी देणारी ठरली.