पोलिस हवालदारावर हल्ला – शासकीय कामात अडथळा, जिवे मारण्याची धमकी
शिक्रापूर (ता. शिरूर) – शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्तव्य बजावत असताना दोन इसमांनी हल्ला करत शिवीगाळ व दमदाटी केल्याची गंभीर घटना घडली. एका अपघाताच्या कॉलवर गेलेल्या सानप यांना ‘मी पुण्याचा डॉन आहे’ म्हणत एका व्यक्तीने धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २८ एप्रिल रोजी मध्यरात्री २.४० वाजता डायल ११२ वर दोन वाहनांच्या अपघाताचा कॉल शिक्रापूर पोलिसांना प्राप्त झाला. पोलिस हवालदार हे त्यांच्या खासगी वाहनाने घटनास्थळी – सणसवाडी येथील हॉटेल जोगेश्वरी मिसळ परिसरात – पोहोचले. तिथे एर्टिगा (MH16DC0475) व स्विफ्ट कार (MH12CY5020) मध्ये झालेल्या अपघाताची चौकशी करत असताना, स्विफ्ट कारमधील इसम अक्षय काळुराम देवकर व ऋषीकेश हरिषचंद्र गुंजाळ हे आक्रमक व मद्यधुंद अवस्थेत होते.
अपघाता संबंधी विचारणा करत असताना ऋषीकेश गुंजाळ हा संतप्त झाला. पोलिसांच्या हातातील डायल ११२ मशीन हिसकावून घेत, “ए हवालदार, मी डॉन आहे. मी एका जेलरला संपवलं आहे. तू परत दिसलास तर तुला जिवंत ठेवणार नाही,” असे म्हणत धमकी दिली. याच वेळी त्याने पोलिसांचे गणवेशाचे बटण फाडले व गळ्यावर नखांनी जखम केली. पोलीस यांना ढकलून मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व चालक पो. हवा तळोले यांनी शासकीय वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळीही गुंजाळ मोठमोठ्याने ओरडत शिवीगाळ करत होता. त्याचे व त्याच्या साथीदाराचे नावे विचारल्यानंतर दोघांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तेथेही गुंजाळने आपल्या साथीदाराला – अक्षय देवकर याला – अपघाताच्या कारणावरून मारहाण केली.
या प्रकारामुळे पोलिस शिस्तीला खुला आव्हान देणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला, मारहाणी व जिवे मारण्याच्या धमकीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.