शिरूर, २९ एप्रिल २०२५ – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रशासक अरुण साकोरे यांनी शेतकऱ्यांच्या हिताला तिलांजली देत घेतलेल्या निर्णयाविरोधात शेतकरी उफाळून बाहेर पडले आहेत. संध्याकाळी ५ ते ८ या सोयीस्कर वेळेऐवजी भल्या पहाटे ४ वाजता बाजार भरवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ शेतकरी कृती समितीने ७ मे रोजी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे यांनी प्रशासनाला दिलेला इशारा स्पष्ट आहे — “आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा शिरूरच्या रस्त्यांवरच शेतकरी बाजार भरवू!”
शेतकऱ्यांच्या व्यथांचा पाढा:
जीवन धोक्यात: रात्री घर सोडताना चोऱ्या, बिबट्यांचे हल्ले आणि अपघाताचा धोका.
भावाचा फटका: पहाटे ग्राहकच नसल्याने शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.
गैरसोयींचा डोंगर: बाजारात शेड, पाणी, वीज यांचा अभाव.
व्यापाऱ्यांचा सापळा: थेट विक्री थांबल्याने ग्राहकांना महाग माल आणि शेतकऱ्यांना कमी दर.
बाजाराचा बिघाड: व्यवस्थापनाचा पूर्ण अपयश, अराजकता वाढली.
शेतकऱ्यांच्या ठाम मागण्या:
बाजार वेळ संध्याकाळी ५ ते ८ पुन्हा सुरु करावी.
बाजारात मूलभूत सोयीसुविधांची तातडीने उपलब्धता.
पार्किंग, कोल्ड स्टोअर्सची व्यवस्था.
अनधिकृत शेड हटवून स्वच्छ व सुरक्षित परिसर.
बाहेरील व्यापाऱ्यांवर नियंत्रण व स्थानिक मालाला प्राधान्य.
‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्री साखळी मजबूत करणे.
प्रशासनाला अंतिम इशारा:
दि. ७ मे रोजी सकाळी १० वाजता धरणे आंदोलन आणि सायंकाळी ५ वाजता थेट रस्त्यावर शेतकरी बाजार भरवण्यात येईल. यानंतरही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही नाथाभाऊ पाचर्णे यांनी दिला आहे.
२८ एप्रिल रोजी यासंदर्भातील निवेदन तहसीलदार, सहकार विभाग आणि पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले असून, शेतकऱ्यांची एकजूट आणि संताप पाहता, शिरूरमध्ये मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत.