गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार गजाआड
पुणे, दि. २६ एप्रिल २०२५ -पुणे शहरात बेकायदेशीर शस्त्र धारण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक १ ने मोठी मोहीम राबवून दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्टल व जीवंत काडतुसेसह गजाआड केले असून, दोन तडीपार गुंडांना धारदार शस्त्रांसह पकडले आहे.
खंडणी विरोधी पथक १ चे सपोनि राजेश माळेगावे व त्यांच्या चमूने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पर्वती पोलीस ठाणे हद्दीतील गणेश वाघमारे (२८) व तेजस शेलार (२५) या दोघांकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. तत्काळ सापळा रचून कारवाई करत तेजस शेलारकडून सिल्व्हर रंगाची गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. एकूण ३५,४०० रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या दोघांकडे शस्त्र परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. हे आरोपी पर्वती व सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डवर नोंदवलेले आहेत.
तसेच, पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश म्हस्के (२०) व रोशन काकडे (२४) या दोघांना देखील धारदार शस्त्रांसह जेरबंद करण्यात आले. या आरोपींवर भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही धडक कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सपोनि राजेश माळेगावे व त्यांचे चमूने ही शस्त्रसाठा विरोधातली मोठी कारवाई उभारली.
पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर पुणेकरांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढवला आहे.