वाळू माफियांशी संगनमताचा धक्कादायक भंडाफोड; महसूल सहायक प्रसाद विटकर यांची थेट हकालपट्टी
पुणे (२८ एप्रिल २०२५): जुन्नर तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रसाद गंगाधर विटकर यांचा काळा कारनामा अखेर उघडकीस! वाळू माफियांशी संगनमत करून शासनाची फसवणूक करणाऱ्या विटकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट हकालपट्टी केली आहे. शासन मालमत्ता लुटणारा सरकारी नोकर अखेर सेवा मुक्त झाला आहे.
भ्रष्टाचाराला ‘झिरो टॉलरन्स’! २०१९ पासून विना परवानगी गायब होणाऱ्या विटकर यांनी, केवळ गैरहजेरीच नव्हे तर वाळू तस्करीच्या मायाजाळात सरकारी यंत्रणेला गंडवल्याचे उघड झाले आहे. शिस्तभंग, कायद्याचे उल्लंघन आणि जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्या विटकर यांना आता सरकारी सेवेतून कायमचे हद्दपार करण्यात आले आहे.
साकोरे (आंबेगाव) येथील घोडनदी पात्रातून बेकायदेशीर वाळू उत्खननास थेट हातभार लावणाऱ्या विटकरवर, मंचर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेची गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल आहे. महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचाही भंग केल्याचे चौकशीने सिद्ध केले.
भ्रष्टाचाराचा काळा चेहरा बाहेर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने विटकर यांच्या कारनाम्यांची चिरफाड केली. चौकशी अहवालाने सिद्ध केले की, सरकारी खात्यात बसलेला एक अधिकारी माफियांचा भागीदार बनून शासनाची लूट करत होता. बचावासाठी मिळालेल्या संधींचा विटकर यांनी केवळ अपमान केला.
“सतत दिलेल्या संधी असूनही सुधारणा नाही, त्यामुळे कठोर शिक्षा अपरिहार्य,” असा ठाम संदेश देत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये विटकर यांना जबर शिक्षा ठोठावली आहे.
विटकर यांना सेवानिवृत्तीची नोंदवहीतून बाद करण्यात आले असून, त्यांना यापुढे कोणत्याही शासकीय पदावर स्थान नाही. भ्रष्ट कारभार करणाऱ्यांसाठी हा निर्विवाद इशारा आहे — सरकारी सेवेत राहायचे असेल, तर प्रामाणिक राहावे लागेल! “भ्रष्टाचार, फसवणूक व बेफिकिरी यांना आता शून्य सहिष्णुता! जनतेचा विश्वास तुटू देणार नाही!” असा ठिणग्या उडवणारा इशारा सरकारने या निर्णयाने दिला आहे.