लोणीकंद, ता. हवेली – काश्मीरमधील पहेलगाम येथे निर्दोष हिंदू पर्यटकांवर इस्लामिक पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लोणीकंद येथे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. लोकनायक जयप्रकाश नारायण ज्येष्ठ नागरिक संघ, सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ही रॅली काढण्यात आली.
रॅली लोणीकंद येथून सुरु होऊन पेरणे फाटा, कोरेगाव भीमा मार्गे डिंग्रजवाडी चौकापर्यंत नेण्यात आली. या रॅलीदरम्यान युवकांनी हाती तिरंगा ध्वज घेत ‘भारत माता की जय’ आणि ‘दहशतवाद मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना उत्तम भोंडवे यांनी सांगितले, “धर्माच्या नावावर निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. हीच खऱ्या अर्थाने मृतांना श्रद्धांजली ठरेल.”
ग्रामस्थांनी केंद्र सरकारकडे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई व ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली. लोणीकंद गावात तीव्र निषेध आंदोलन होऊन एकात्मतेचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला.