लोणीकंद (ता. हवेली) – ग्रामीण भागात एकतेच्या बळावर काय साध्य होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून, लोणीकंद येथील डॉ. बसु विद्या धाम हायस्कूल शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लांटची उभारणी करण्यात आली, या प्लांटचे उद्घाटन शिरूर शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश बोरा व कुमार बोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याने ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे, या उपक्रमात उद्योजक शाम जयहिंद पठारे यांनी १ लाख ४० हजार रुपयाची भरीव आर्थिक मदत देत मोलाचे योगदान दिले. याशिवाय, प्लांटसाठी आवश्यक असलेल्या पत्र्याच्या शेडचा संपूर्ण खर्च दत्तात्रय झुरूंगे व किरण साकोरे यांनी उचलून सामाजिक बांधिलकी जपली.
प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उत्तम भोंडवे, मा. स. नारायण कंद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कंद, श्रीकांत कंद यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व देणगी दारांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागातून साकारलेली ही योजना ग्रामीण एकात्मतेचा उत्तम नमुना ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी उचललेले हे पाऊल गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.