पत्रकार-विजयराव लोखंडे
तुळापूर (ता. हवेली) येथील प्रसिद्ध श्री खंडोबा देवस्थानची ताब्यात असलेली सुमारे ४९ एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मांजरी बुद्रुक व तुळापूर परिसरातील या जमिनीवर मालकी हक्कावरून देवस्थान ट्रस्ट व पुजारी (होलगुडे) यांच्यात तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे.
पुजाऱ्यांचे धरणे आंदोलन
या वादाचा पाठपुरावा करत पुजाऱ्यांनी अलीकडेच देवस्थानच्या पायथ्याशी धरणे आंदोलन केले. त्यांनी ट्रस्टवर विविध आरोप करत प्रसारमाध्यमांतून आवाज उठवला होता. मात्र, देवस्थान ट्रस्टकडून सादर करण्यात आलेल्या जुन्या कागदपत्रांच्या आधारे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
ट्रस्टचे प्रतिपादन
देवस्थानचे अध्यक्ष मधुकर घुले, सचिव विश्वास घुले व विश्वस्त रंगनाथ शिवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२व्या शतकात मांजरी बुद्रुकमधील जमीन दानस्वरूपाने खंडोबा देवस्थानाला दिली गेली होती. त्यावेळच्या दस्ताऐवजानुसार, सातबारा उताऱ्यावर या जमिनीवर देवस्थानचे नाव स्पष्ट होते.
त्या काळी उत्पन्नासाठी पुजाऱ्यांचे पूर्वज व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून नेमले गेले. त्यांच्या सहीने ही जमीन घुले कुटुंबीयांना खंडाने देण्यात आली. १९३१ पासून दर २५ वर्षांच्या कालावधीसाठी ही खंडपट्टीची नोंद सुरु होती आणि ९५ वर्षे ही प्रथा सुरु राहिली.
मालकी हक्कातील घोळ
काळाच्या ओघात मॅनेजरचे वारस म्हणजे आजचे पुजारी होलगुडे कुटुंब यांची नावे सातबाऱ्यावर आली. यानंतर २००४, २००५ व २००७ साली पुजाऱ्यांच्या वतीने तीन स्वतंत्र जमीन व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. रजिस्टर साठेखत, विसर पावती अशा माध्यमातून हे व्यवहार झाले. या सर्व व्यवहारांवर देवस्थानचे नाव सातबाऱ्यावर असतानाही कसे झाले, हा मुख्य प्रश्न आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
देवस्थान ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, पुजाऱ्यांनी स्वार्थासाठी आर्थिक गैरव्यवहार केला असून, जुनी कागदपत्रे याची साक्ष देतात. तसेच तुळापूर परिसरातील २५ एकर जमिनीच्या काही भागांतील जंगलाची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचेही समोर आले आहे. याकडे स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांचे दुर्लक्ष झाल्याचे ट्रस्टच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
पुजाऱ्यांची बाजू
दुसरीकडे, पुजारी किसनराव होलगुंडे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “२००४, २००५ व २००७ मधील व्यवहार मला माहित नाहीत. त्या काळात मी मुंबईत होतो. मी अलीकडेच गावी परतलो आहे.”
तसेच त्यांनी सातबाऱ्यावर पुजाऱ्यांची नावे कशी आली याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. ट्रस्ट रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. जमीन विक्रीसाठी घेतलेल्या दहा लाख रुपये निविदा संदर्भातही त्यांनी सवाल उपस्थित केला – ही रक्कम ट्रस्टने परत का केली नाही? याचा अर्थ ट्रस्ट भविष्यात तिच व्यक्तीशी व्यवहार करण्याच्या तयारीत आहे, असा गंभीर आरोप होलगुंडे यांनी केला.
पुढील काय?
या सगळ्या घडामोडींमुळे तुळापूर श्री खंडोबा देवस्थानची मालकी व व्यवस्थापन या संदर्भात संपूर्ण तपासणी व न्यायप्रविष्ट निर्णयाची आवश्यकता निर्माण झाली आहे. ट्रस्टच्या हक्कांच्या संरक्षणासाठी स्थानिक प्रशासन व महसूल विभागाने यामध्ये स्पष्ट हस्तक्षेप करण्याची अपेक्षा आहे.