नागरिकांत भीतीचे वातावरण; अनधिकृत भंगार दुकानांवर कारवाईची मागणी
हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे मध्यरात्री भंगार दुकानाला अचानक लागलेल्या आगीने मोठा भडका घेतला. आगीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटाने परिसरात दणका बसला आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाचारण केल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या घटनेनंतर भरवस्तीतील अनधिकृत भंगार दुकाने हा गंभीर सुरक्षेचा मुद्दा ठरतो आहे. नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या या दुकांनांकडे कोणतेही कायदेशीर परवाने नाहीत. प्लास्टिक, लोह आणि इतर ज्वलनशील वस्तूंचा साठा सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे केला जातो आहे. यामुळे आग आणि प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या पार्श्वभूमीवर संबंधित भंगार दुकानदारांची चौकशी करून परवाने नसलेल्या दुकांनांवर तात्काळ बंदी आणावी आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अनधिकृत भंगार दुकांनां आळा बसणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अशी संकटं पुन्हा उद्भवू शकतात.