पुणे, १७ एप्रिल २०२५: पुणे शहरातील मार्केटयार्ड वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या गगणविहार चौक ते वाय जंक्शन, गंगाधाम सोसायटी या अंतर्गत रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने, पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी त्या परिसरात नो पार्किंग झोन घोषित केला आहे.
हा निर्णय मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(अ)(ब), ११६(४) व ११७ अन्वये घेण्यात आला असून, सदर ठिकाणी यापूर्वी अस्तित्वात असलेले पार्किंगसंबंधी आदेश रद्द करण्यात आले आहेत.तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी हॉटेल मेघदूत ते वर्धमानपुरा सोसायटी या ६०० मीटर अंतराच्या पट्ट्यात ‘पी-१, पी-२’ पार्किंग झोन निर्माण करण्यात येत आहे.
नागरिकांनी या निर्णयावर आपले सूचनाही लेखी स्वरूपात पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा, पुणे येथे दिनांक २१/०४/२०२५ ते २८/०४/२०२५ दरम्यान सादर कराव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून अंतिम आदेश जाहीर करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वाहनांना (जसे की अग्निशमन, रुग्णवाहिका, पोलीस इत्यादी) यामधून वगळण्यात आले आहे. – वाहतूक पोलीस, पुणे शहर