शिरूर (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असून, शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, शिरूर येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे होणार आहे.
या सोडतीबाबत ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवकांना संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच तलाठी चावडीवर प्रसिध्दी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याचा अहवाल २१ एप्रिल २०२५ पर्यंत तहसील कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
तसेच सर्व ग्रामसेवकांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिकांना सोडतीच्या दिवशी उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे, असे आदेश तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिले आहेत. आरक्षण सोडतीच्या वेळी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना शिरूर पोलीस स्टेशनला देण्यात आल्या आहेत.