सामाजिक बदलाची सुरुवात स्मशानभूमीतून – उत्तम भोंडवे यांचा विचारधन!”
लोणीकंद (प्रतिनिधी): समाजप्रबोधन केंद्राचे संस्थापक आणि प्रभावी सामाजिक कार्यकर्ते उत्तम विठ्ठल भोंडवे यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. गावातील स्मशान भूमीतील प्रवचन शेड व वाशरूम सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी या विषयावर ठोस पावले उचलली आहेत.
गावातील धार्मिक मंदिरे, शैक्षणिक संस्था, समाज मंदिरे यांच्याबरोबरच स्मशानभूमीतील सुविधा ही गावाच्या सामाजिक उंचीची निदर्शक असते, असे भोंडवे यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी प्रवचनासाठी पत्र्याची शेड नसल्याने दशक्रियेसाठी आलेल्यांना उन्हात व पावसात ताटकळत बसावे लागते. यावर तोडगा काढत त्यांनी आपटी येथील स्मशान भूमीसाठी स्वतः देणगी दिली असून, वढु बु येथे प्रवचन शेड उभारणीसाठी देणगी देण्याचे जाहीर केले आहे.
याचबरोबर, पिंपळगाव येथील त्यांच्या बहिणीच्या स्मरणार्थ ७५०००/- रुपायाची फरशी प्रवचन शेडमध्ये बसवण्यात आली असून, रघुनाथ कंद यांनी चिंचोशी येथील आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ अशीच देणगी देऊन या कार्यात हातभार लावला आहे.
भोंडवे म्हणतात, “सामाजिक सुधारणा सगळ्यांच्या मनात असते, सुरुवात कोण करणार हा खरा प्रश्न असतो.” त्यांच्या या सकारात्मक पुढाकाराने इतरांनीही सहमती दर्शवली असून, अनेक कार्यकर्त्यांनी यावर उघडपणे समर्थन दिले आहे.
गावात शैक्षणिक इमारतींची गुणवत्ता, समाजमंदिरांची सुसज्जता आणि स्मशानभूमीतील सुविधा यावरून खऱ्या अर्थाने गावाची प्रगती मोजता येते, असा भोंडवे यांचा स्पष्ट संदेश आहे.
त्यांचा हा विचार आणि कृती समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारी ठरत आहे.
“देणगी म्हणजे केवळ पैसा नाही, ती एक जबाबदारी असते – समाजासमोर आदर्श निर्माण करण्याची.” – उत्तम विठ्ठल भोंडवे