गुन्हेगारीच्या मुसक्या आवळणारा तपास – पुणे पोलिसांची धडक कारवाई
पुणे, खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी एक अत्यंत गंभीर आणि अति संवेदनशील गुन्हा उलगडण्यात यश मिळवले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्हा रजि. क्र. ५९/२०२५ अन्वये भादंवि कलम ६४, ६४(२), एम. ३५१(२), ११५(२), १२७(२) या कलमांखाली दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास स्थानिक रहिवासी, ड्रोन कॅमेरे, डॉग स्कॉड यांच्या मदतीने गुनाट, ता. शिरुर येथून अटक करण्यात आली.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या अटकेनंतर आरोपीस १२ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवून सखोल तपास करण्यात आला. या तपासात वैद्यकीय तज्ञ, सायबर तज्ञ, साऊंड इंजिनियर, रासायनिक विश्लेषक तज्ञ, फोटोग्राफर आदींच्या मदतीने आरोपीविरुद्ध भौतीक, जैविक, तांत्रिक व शास्त्रोक्त पुरावे गोळा करण्यात आले.
तपास अधिकारी श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक – १ यांनी तब्बल ८९३ पानांचे सविस्तर दोषारोपपत्र आज दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्र. ८, शिवाजीनगर, पुणे यांच्यासमोर सादर केले.
या गुन्ह्याच्या यशस्वी उकल व दोषारोपपत्र सादरीकरणामुळे पुणे पोलिसांची गुप्त माहिती गोळा करण्याची क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि तपासातील काटेकोरपणा अधोरेखित झाला आहे. हा गुन्हा पुणे शहरातील गुन्हेगारी विरोधातील लढ्यात मोलाचा ठरत आहे