प्रतिनिधी, लोणीकंद
हवेली तालुक्यातील लोणीकंद गावासाठी अभिमानाची बाब ठरली असून गावचे सुपुत्र पृथ्वीराज हनुमंत कंद यांची महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) या राज्यस्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी ‘इगल नाशिक टायटन’ संघात निवड करण्यात आली आहे. येत्या ३१ मे २०२५ पासून गहुंजे येथील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा रंगणार आहे.
पृथ्वीराज कंद हे लोणीकंदचे प्रसिद्ध उद्योजक हनुमंत गुलाबराव कंद यांचे चिरंजीव असून मा . ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच असलेल्या ओंकार कंद यांचे बंधू आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
बालपणापासून क्रिकेटविषयी अत्यंत प्रगाढ आकर्षण असलेल्या पृथ्वीराज यांनी आपल्या खेळाच्या कौशल्याचा ठसा अनेक स्तरांवर उमटवला आहे. अंडर-१४ व अंडर-१६ शालेय ऑलिंपिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर त्यांनी मॉडर्न कॉलेज, पुणे कडून युनिव्हर्सिटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला. विशेष म्हणजे, त्यांनी इंग्लंडमध्ये सलग चार वर्षे क्लब क्रिकेटमध्ये भाग घेतला असून, तिथेही त्यांनी आपल्या कामगिरीने कौतुकाची थाप मिळवली आहे.
स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नेट प्रॅक्टिस व फिटनेसवर भर दिला होता. अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून ‘इगल नाशिक टायटन’ संघाने त्यांच्यावर विश्वास दाखवत संघात स्थान दिले आहे.
या निवडीनंतर लोणीकंद गावामध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी पृथ्वीराज यांचे जोरदार स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
“ही निवड म्हणजे माझ्या स्वप्नांची सुरुवात आहे. गावाचे नाव मोठं करायचं हेच ध्येय आहे,” असे भावनिक शब्दात पृथ्वीराज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोणीकंद ग्रामस्थांनी पृथ्वीराजला मनःपूर्वक शुभेच्छा आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या या नव्या ताऱ्याला उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा